परिचय
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाचे संकेतस्थळ नागरिकांसाठी उपलब्ध करून देताना मला अत्यंत आनंद होत आहे. या संकेतस्थळाद्वारे राज्यातील, राज्याबाहेरील तसेच परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती, लाभार्थ्यांसाठी लागणारे पात्रता निकष, प्रादेशिक व क्षेत्रीय कार्यालयांची माहिती, तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क (ई-मेल, दूरध्वनी व पत्ता) या सर्व बाबींचा एकत्रित परिचय उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय, या संकेतस्थळावर विभागाशी संलग्न असलेल्या नागपूर येथील महाज्योति, पुणे येथील अमृत कार्यालय, इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ व त्याअंतर्गत कार्यरत १५ उपकंपन्या तसेच वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ व त्याअंतर्गत कार्यरत ७ उपकंपन्या यांची माहिती समाविष्ट करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील आश्रमशाळा, नामांकित शाळा व निवासी शाळांची माहिती सहज मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. शासनाचे महत्त्वाचे निर्णय, परिपत्रके तसेच विभागाशी संलग्न इतर शासन विभागांचे संकेतस्थळ दुवे (links) या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत, ज्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व आवश्यक माहिती मिळू शकेल. भविष्यात अधिकाधिक पारदर्शकता व सुलभता निर्माण करण्यासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याचा आमचा मानस आहे. या दृष्टीने, नागरिकांनी आपले मौल्यवान अभिप्राय व सूचना आम्हाला [ई-मेल पत्ता] वर पाठवावेत. त्यानुसार संकेतस्थळात आवश्यक सुधारणा करून ते अधिक परिणामकारक करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे संकेतस्थळ जनतेसाठी उपयुक्त, माहितीपूर्ण व मार्गदर्शक ठरेल, असा मला विश्वास आहे.
आप्पासो धुळाज, भा. प्र. से.
सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग
विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंलबजावणी होण्यासाठी दिनांक ९ मार्च, २०१७ रोजीच्या अधिसूचनेन्वये इतर मागास बहुजन कल्याण या स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात आलेली आहे.
या विभागाकडे सोपविण्यात आलेल्या विषयाबाबतची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने दि.०९.०३.२०१७ अन्वये निर्गमित केली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या दि.०९.०३.२०१७ च्या अधिसूचनेनुसार या विभागाकडे विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग या प्रवर्गाशी संबंधित पुढील १६ विषय सोपविण्यात आले.
-
- विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या कल्याणाकरिता प्रशासकीय यंत्रणा व महामंडळे
- विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या कल्याणकारी कामांसाठी समन्वय साधणे
- इतर मागासवर्गासाठी केंद्र शासनाने मंजूर केलेली अनुदाने,
- विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी वसतिगृहे,
- विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या आश्रमशाळा/उच्च माध्यमिक आश्रमशाळा,विद्यानिकेतन तसेच ऊस तोड कामगारांच्या मुलांसाठी आश्रमशाळा/निवासी शाळा संबंधित सर्व बाबी
- विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी सहकारी गृहनिर्माण योजना
- विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी आंतरजातीय विवाह योजना,
- विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी केंद्र व राज्य शासनाची शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, विद्यावेतन, व्यावसायिक प्रशिक्षण इ. योजना
- सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणासह, सामाजिक कार्यासाठी प्रशिक्षण आणि संशोधन
- सामाजिक कार्याचा समन्वय साधणे
- विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी विविध कल्याणकारी योजना राबविणे, स्वयंसेवी संस्थांना / अशासकीय संस्थांना आर्थिक सहाय्य व अनुदान देणे,
- विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या व्यक्तींना/संस्थांना / विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुरस्कार प्रदान करणे,
- विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाला नेमून दिलेल्या कोणत्याही विषयासंबंधातील हुकूनाम्याची देय असलेली रक्कम निर्लेखित करणे
- या अनुसूचीतील कोणत्याही बाबींच्या प्रयोजनासाठी चौकशी व आकडेवारी
- या सूचीतील कोणत्याही बाबींच्या संबंधात परंतु कोणत्याही न्यायालयात स्वीकारण्यात न आलेली फी,
- राज्याच्या प्रयोजनासाठी शासनाकडे विहित केलेली किंवा शासनाच्या ताब्यात असलेली आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाला नेमून दिलेली बांधकामे, जमिनी व इमारती.
त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि. २५.०६.२०१९ च्या शासन निर्णयान्वये खालील विषय या विभागाकडे वर्ग केले आहेत.:-
- इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांचे सुचीमध्ये एखादी जात समाविष्ट करणे,
- इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गाच्या जातविषयक सर्व बाबी
या प्रशासकीय विभागांतर्गत खालील आस्थापना कार्यरत आहेत
- इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे,
- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (मर्यादित), मुंबई
- वसतंराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित), मुंबई
- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर
- महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे.
- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे.